Sunday, October 13, 2024

शिवाजी कोण होता?’ - एक विचारप्रवर्तक पुस्तक


शिवाजी कोण होता ? 
या पुस्तकाची पहीली आवृत्ती एप्रिल १९८८ मध्ये ३००० प्रतीची निघाली होती आणि इतक्या उशिरा हे पुस्तक मी वाचलं यांची मनाला खंत वाटतेय.आत्तापर्यंत या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत.२४ भारतीय भाषांत भाषांतर ही झालेलं आहे. या पुस्तकाच्या नावबद्दलही बरीच चर्चा झाली आहे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेलाय म्हणुन टीका झाली,आक्षेप घेतले गेले,विरोध झाला. परंतू जेव्हा हे पुस्तक पुर्ण वाचुन होत,तेव्हा समजंत हे नाव किती समपर्क आहे. या नावामागची त्यांची भूमिका किती स्पष्ट आहे हे समज़ुन येतं. शिवाजी महाराज हे फक्त काही एका जाती-धर्मा पुरतेच मर्यादित नसून तो कुळवाडी भुषण रयतेचा राजा होता हेच या नावावरुन कॅा.पानसरे यांना सुचवायचे होते.

या पुस्तकाच्या माध्यमातुन समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात एक मोठी क्रांतीच केली आहे आणि शिवाजी महाराजांच्या कार्याचे खरे स्वरुप लोकांच्या समोर मांडले. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करुन समाजात जातीय तेढ पसरवणाऱ्या शक्तींच्या प्रचाराला आळा बसला आहे. समाजजीवनात प्रवेश करणाऱ्या तरुण पिढीला इतिहासाचे नवे भान देण्याचे हे कार्य आपल्याला करायचे आहे. ही दृष्टी देणारे ‘शिवाजी कोण होता? हे महत्वाचे विचारधन आहे.

शहीद कॅा.गोविंद पानसरे यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे,तर देशातील सर्व जनतेसमोर खरे शिवाजी महाराज ‘लोक राजे’ यांची वस्तुनिष्ठ मांडणी करुन ऐतहासिक काम केले आहे.त्यांच्या खुनाचे एक कारण हे त्यांचे हे पुस्तक ही असू शकते असेलही.पानसरे यांनी या पुस्तकाच्या रुपाने पुरोगामी महाराष्ट्राला दिलेली ही अविस्मरणीय देणगी आहे.

महाराज राजा म्हणून नेमके कसे होते? सामान्य रयतेला राजा जवळचे का वाटायचे? सामान्य लोक राजासाठी स्वतःचा जीव द्यायला सहजासहजी का तयार होत? इतर राज्यकर्ते व शिवाजी महाराज यांच्यात काय वेगळेपण होतं? शिवाजी राजांच्या काळात व्यापार व उद्योग संरक्षणासाठी काय नियम होते? महाराजांचे हिंदू व इतर धर्माबद्दल काय विचार होते? इतिहासाचा विपर्यास का केला जातो?अश्या आणि इतर अनेक गोष्टी या पुस्तकात सोप्या व सगळ्यांना चटकन् कळेल अश्या भाषेत मांडल्या आहेत. शिवाजी महाराज यांच्या बद्दल थोडक्यात पण मुद्देसूद जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचायला हवे..!
 जय शिवराय🙏❤️
                                     - ✍️मिथिलेश गायकवाड🌱

शिवाजी कोण होता?’ - एक विचारप्रवर्तक पुस्तक

शिवाजी कोण होता ?  या पुस्तकाची पहीली आवृत्ती एप्रिल १९८८ मध्ये ३००० प्रतीची निघाली होती आणि इतक्या उशिरा हे पुस्तक मी वाचलं यां...